सीना नदीला महापूर – हजारो लोकांचे जनजीवन विस्कळीत, लाखो एकर शेती व फळबागांचे प्रचंड नुकसान
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
सोलापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी –गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर, बीड, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे सीना नदीने शेकडो वर्षानंतर रौद्र रूप धारण केले आहे. या पुरामुळे हजारो लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने मोठ्या प्रमाणात नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. शेकडो जनावरे मृत्युमुखी पडली, तर हजारो जनावरे विस्थापित झाली असून चाऱ्याचा प्रश्न गंभीर स्वरूपात उभा राहिला आहे.अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत.अनेक पूल, बंधारे वाहून गेल्याने कित्येक गावाशी संपर्क तुटला आहे.या भागातील सर्व शेती व पिकांचे नुकसान झाले आहे
💥 ऐतिहासिक दंतकथांचा पुनरुच्चार
सीना नदीचा उगम अहमदनगर जिल्ह्यात होत असून या नदीत बीड, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातूनही पाणी मिळते. ऐतिहासिक संदर्भानुसार औरंगजेबाच्या मोहिमेतील हत्ती व सैन्य या नदीच्या पुरात वाहून गेले होते, अशी दंतकथा स्थानिकांमध्ये प्रचलित आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरून वाहणारी ही नदी भौगोलिक व ऐतिहासिक महत्त्वाची मानली जाते.
💥जनजीवन विस्कळीत – शेतकरी उध्वस्त
या अतिवृष्टीमुळे हजारो एकर शेती वाहून गेली असून लाखो एकर क्षेत्रातील पिके व फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. ऊस,केळी, सोयाबीन, मका, तूर, लिंबू, डाळिंब, द्राक्ष यांसह अनेक पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. पूरग्रस्त भागातील अनेक गावे पूर्णतः पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर ओढवलेला आर्थिक संकंट अधिकच गडद झाला आहे.
💥मदतीसाठी संस्थांची धावपळ
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. शिवसेना मदत कक्ष, पोलीस संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह अनेक स्थानिक मंडळे,स्वयंसेवक व कार्यकर्ते गावोगावी जाऊन जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य व पिण्याचे पाणी वाटप करत आहेत. प्रशासनाकडूनही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
💥शासनाची भूमिका
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील, असे स्पष्ट केले आहे.तात्काळ पूरग्रस्तांना १० हजार व राशनची मदत देण्यात येत आहे.पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे अतिरिक्त मदत निधीची मागणीही करण्यात आली आहे.सरसकट पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.लवकरच सर्वांना नुकसान भरपाई देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.महायुती शासनाने तातडीने सर्व जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना पूरस्थिती नियंत्रणासाठी आदेश दिले आहेत.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह पालकमंत्री जयकुमार गोरे, विविध मंत्री आमदार यांनी पूरग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांना धीर देत आहेत
💥जनमानसाची मागणी – ‘ओला दुष्काळ जाहीर करावा’
शेकडो वर्षानंतर आलेल्या या प्रचंड महापुरामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सीना नदी प्रवण क्षेत्रात शासनाने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी जनमानसाची जोरदार मागणी आहे. केवळ मदत निधीच नव्हे तर कर्जमाफी, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था, पुनर्वसन व पिक विमा दावे तत्काळ मंजूर करणे ही गरज व्यक्त होत आहे.
टिप्पण्या