कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा प्रतिनिधी:- कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ? असा संतप्त सवाल करत माजी जि. प. सदस्य विलास राऊत - पाटील यांनी विद्यमान आमदार नारायण पाटील यांना प्रश्न केले आहेत तसेच माजी आमदार संजयमामा शिंदे व आमदार नारायण पाटील यांच्या कामाचा लोखाजोखा त्यांनी मांडला आहे.
याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले कि,२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस विद्यमान आमदारांनी ३६५ दिवस योजना चालवण्याचे आश्वासन मतदारांना दिले होते.कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार उन्हाळी आवर्तन ५ मार्च २०२५ पासून सुरू झालेले आहे. उजनी धरणावरील सर्वच उपसा सिंचन योजना व कालवे हे ५ तारखेपासून सुरू झालेले आहेत .उजनी धरणात अवघा ४२ टक्के पाणीसाठा आहे. मार्च च्या तीव्र उन्हामुळे पिके पाणी अभावी जळू लागलेली आहेत असे असतानाही अद्याप दहिगाव उपसा सिंचन योजना सुरू झालेली नाही.एकूणच आमदार नारायण पाटील यांनी निवडणुकीत मतदारांना ३६५ दिवस दहिगाव योजनेचे पाणी देण्याचे अश्वासन फोल ठरले आहे.याऊलट माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यकाळात दहिगाव योजना ही उजनी धरणावरील सर्वात प्रथम सुरू होणारी आणि सर्वात उशिरा बंद होणारी उपसा सिंचन ही योजना अशी ख्याती होती याची नोंद जलसंधारण कार्यालयाकडे आहे.सन २०१९ ते २४ या मागील पंचवार्षिक मध्ये माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रत्येक वर्षी सरासरी २०० ते २४० दिवस योजना चालवली.विशेष महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या कार्यकाळात उन्हाळी आवर्तन हे प्रत्येक वर्षी १०० दिवसापेक्षा अधिक चाललेले आहे. २०२३ मध्ये दुष्काळ असताना उजनी धरण अवघे ६०% भरलेले होते त्यावेळेस संजयमामांनी रब्बी आवर्तन हे तब्बल ११६ दिवस चालवले. .
विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे दिलेले आश्वासन आता कुठे गेले? असा संतप्त सवाल घोटीचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास राऊत - पाटील यांनी विचारला आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये दहिगाव योजना चालवत असताना कृष्णा खोरे महामंडळ यांच्याकडून साडेपाच कोटी विज बिल भरणा करणे, वीज बिलाचा दर कमी करणे आणि अतिशय कठीण प्रसंगी ज्यावेळेस दहिगाव उपसा सिंचन योजनेचे कनेक्शन विज बिल न भरल्यामुळे कट केले होते त्यावेळेस संजयमामा शिंदे यांच्या विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगाव या कारखान्याने बिल भरण्याची हमी घेतल्यानंतर योजना सुरू झाली होती.यापैकी कोणता तरी पर्याय विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार नारायण पाटील यांनी निवडून दहिगाव योजना सुरु करण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे
टिप्पण्या