पाईप जळीत प्रकरणाचा तपास आणि दहिगाव योजनेचे बंद काम सुरू करण्यासाठी अर्जुननगर फाटा येथे तालुकाध्यक्ष भारत औताडेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको...

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा, प्रतिनिधी - तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदनलिका वितरण प्रणालीचे काम बंद आहे. हे काम पुन्हा सुरू करण्यासाठी आणि या योजनेचे पाईप जाळण्याच्या घटनेचा तपास जलद होऊन आरोपींना शिक्षा करण्याच्या मागणीसाठी करमाळा-कुर्डूवाडी रोडवरील अर्जुननगर फाटा येथे असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी रास्ता रोको करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. 
          मा.आ. संजयमामा शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीचे काम मंजूर करून घेतले होते. गेल्या वर्षी या कामाला सुरुवात झाली होती. बंद नलिकेने पाणी वितरण करणे बंधनकारक नसताना मा.आ. शिंदे यांनी ही योजना लादल्याचे तसेच बंदनलिकेमुळे लाभक्षेत्रात पाण्याचा पाझर होणार नसल्याचे सांगत या योजनेला विरोध होत आहे. त्यातूनच या योजनेचे काम बंद पाडून दोन वेळा या योजनेचे पाईप जाळण्याचा प्रकार घडल्याची करमाळा पोलिसांत नोंद आहे. मात्र खुल्या पाणी वहनामुळे मर्यादित प्रमाणात असलेले पाणी लाभक्षेत्रातील २४ गावांना शेवटपर्यंत पोहोचत नसल्याचे सांगत बंदनलिका योजना शेतकऱ्यांना लाभदायी असल्याच्या मतप्रवाहाचाही एक समूह आहे. या दोन वेगवेगळ्या मतप्रवाहांमुळे या योजनेचे काम वारंवार बंद पडत आहे. यामुळे आजी-माजी आमदार आणि त्यांचे समर्थक यांच्यात खटके उडण्याचे प्रमाण सध्याच्या काळात वाढले असून एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपामुळे या योजनेच्या पूर्ततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर बंदनलिका वितरण प्रणालीच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी झालेल्या आंदोलनाला भाजपाचे गणेश चिवटे, मनसेचे संजय घोलप आणि नानासाहेब मोरे यांच्यासह विविध संघटनांनी पाठिंबा देत उपस्थिती दर्शविली. लग्नसराई सुरू असल्याने तसेच वर्दळीचा रस्ता असल्याने सुमारे ५० मिनिटे चाललेल्या या आंदोलनावेळी अर्जुननगर फाटा येथील चौकात चहुबाजूनी लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी भरत अवताडे, गणेश चिवटे, हनुमंत मांढरे, घोटीचे सरपंच विलास राऊत, शितल क्षिरसागर, विवेक येवले, विकास वीर यांनी दहीगाव सिंचन योजनेच्या बंदनलिका वितरण प्रणालीच्या समर्थनार्थ भाषणे झाली.
          दरम्यान वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याचे लक्षात आणून देत करमाळा पोलीसांनी आंदोलकांना समज देण्याचा प्रयत्न केला. यानंतर दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या पाईप जळीत प्रकरणी लवकरच आरोपी शोधून काढण्याचे आश्वासन सपोनि रोहित शिंदे यांनी दिले तर दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उप अभियंता संजय राजगुरू यांनी दि. ३० मे २०२५ पर्यंत या योजनेचे काम पुन्हा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर हे आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर करत अवताडे यांनी मागण्यांची पूर्तता न झाल्यास ५ जून रोजी थेट विधान भवनावर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला.
आंदोलनानंतर करमाळा पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली. या आंदोलनाला दहिगाव उपसा सिंचन योजना लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल