जागतिक महिला दिनी लाडक्या बहिणींना राज्य सरकारचे गिफ्ट...फेब्रुवारी मार्चची रक्कम मिळणार एकत्रित
मुंबई : जागतिक महिला दिनी लाडक्या बहिणींना राज्य सरकारचे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे.फेब्रुवारी व मार्च महिन्याची रक्कम आता पात्र महिलांना एकत्रित मिळणार आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात प्रति महिना १५०० देण्यास सुरुवात केली आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने, तसेच योजनेसाठी पात्र आणि अपात्र महिलांची छाननी सुरू झाल्याने योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.
राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दिला जाणार आहे. दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी १५०० याप्रमाणे ३ हजार रुपयांची रक्कम ८ मार्च रोजी म्हणजेच जागतिक महिला दिनादिवशी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी वित्त विभागाकडून निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता महिला दिनी दोन्ही हप्ते एकत्र मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.
टिप्पण्या