मराठा समाजाला वेठीस धरण्याचा प्रकार उघड...अण्णासाहेब पाटील महामंडळातील मनमानीला कुणाचे अभय? मुख्यमंत्री फडणवीसांनी तात्काळ हस्तक्षेप करावा – नितीन झिंजाडे
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा (प्रतिनिधी): मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सध्या अपयशी ठरत असून, महामंडळातील सत्ताधाऱ्यांची मनमानी, बेजबाबदार व समाजविरोधी भूमिका चव्हाट्यावर आली आहे. महामंडळाच्या व्यवस्थापनाकडून अर्जदारांवर उघडपणे अन्याय होत असून, मराठा समाजाला जाणीवपूर्वक वेठीस धरण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करमाळा भाजपा सरचिटणीस नितीन झिंजाडे यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्वतः फेसबुक लाईव्ह येऊन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (MD) मनमानी कारभार करत असल्याचा थेट आरोप केला आहे. अध्यक्षच जर एमडीवर आरोप करत असतील, तर महामंडळातील प्रशासन किती ढासळले आहे, याचा प्रत्यय येतो.
या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत नितीन झिंजाडे, करमाळा तालुका भाजपा सरचिटणीस, यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. नितीन झिंजाडे यांनी सांगितले की,
“गेल्या २ ते ३ महिन्यांपासून मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या व्याज परतावा योजनेच्या मंजुऱ्या जाणीवपूर्वक थांबवण्यात आल्या आहेत. कर्ज काढून उद्योग, व्यवसाय व रोजगार उभा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मराठा तरुणांना सरसकट ‘जिल्ह्याचा कोटा संपला आहे’ किंवा यासारखे बेसबंध कारणे देत अर्ज नाकारले जात आहेत. हा प्रकार प्रशासनिक निष्काळजीपणा नसून थेट मनमानी व षडयंत्र असल्याचा संशय बळावला आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या मराठा समाजातील तरुण, शेतकरी व उद्योजक अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. “आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे. महामंडळ आहे, योजना आहेत, पण लाभ मात्र समाजाला मिळत नाही. हा मराठा समाजाशी उघड विश्वासघात आहे,” असा घणाघात नितीन झिंजाडे यांनी केला.महामंडळाच्या अध्यक्षांनीच एमडीवर उघड आरोप करणे ही बाब अत्यंत गंभीर असून, तरीही शासनस्तरावर अद्याप ठोस कारवाई न होणे हे आश्चर्यकारक आहे. मराठा समाजाशी संबंधित योजनांमध्ये अशी उदासीनता व अडवणूक का? कोणाच्या इशाऱ्यावर हा प्रकार सुरू आहे? असे थेट प्रश्न उपस्थित होत आहेत.
“जर शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मनमानी कारभारावर लगाम घातला नाही, तर मराठा समाजात तीव्र असंतोष निर्माण होईल. याची संपूर्ण जबाबदारी महामंडळाचे व्यवस्थापन आणि त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी यांची असेल.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून
💥दोषी एमडी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,
💥रखडलेल्या व्याज परतावा मंजुऱ्या त्वरित सुरू कराव्यात,
💥आणि मराठा समाजाचा विश्वास पुनःस्थापित करावा,
अशी ठाम मागणी नितीन झिंजाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.