"आदिनाथ" अकलूजच्या दावणीला बांधाण्याचे मोहिते पाटलांचे प्रयत्न यातील अर्थकारण,राजकारण बघता सभासद डोळसपणे निर्णय घेतील:मा.आ.संजयमामा शिंदे
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा :- "आदिनाथ" च्या मागे मोहिते पाटलांचे मोठे अर्थकारण,राजकारण असून यातून आदिनाथ मोहिते पाटलांच्या दावणीला बांधण्याचे मोहिते पाटलांचे षडयंत्र आहे.आदिनाथचे सभासद मतदानावेळी डोळसपणे निर्णय घेतील असा विश्वास महायुती आदिनाथ बचाव पॅनलप्रमुख तथा माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केला आहे.आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान दोन्ही गटांकडून एकमेकांवरती दररोज नवनवीन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.यामुळे सभासद शेतकरी हे मात्र संभ्रमित अवस्थेत आहेत.नेमका विश्वास कोणावर ठेवायचा असा गोंधळ निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आवाहन करताना माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सभासदांनी डोळसपणे निर्णय घ्यावा व कारखाना चालू करण्याची कुवत व क्षमता कोणामध्ये आहे हे ओळखावी व आपले अनमोल मत कारखान्याला उर्जित अवस्था प्राप्त करून देईल अशा पॅनलला द्यावे असं त्यांनी म्हटले आहे.
याविषयी बोलताना ते म्हणाले की,आदिनाथच्या निवडणुकी पाठीमागे मोहिते पाटलांचे मोठे अर्थकारण व राजकारण आहे.विठ्ठलराव शिंदे ,पांडुरंग, सहकार महर्षी ,आदिनाथ हे सर्व उजनीच्या पाण्यामुळे अस्तित्वात आलेले साखर कारखाने आहेत.पण आज ह्या सर्वांमध्ये फरक पडला आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. मोहिते पाटलांचा सहकारमहर्षीचा दर हा शिंदे परिचारकांच्या कारखान्यापेक्षा कायम टनाला ३०० रुपयांनी कमी आहे.या कारणांमुळे आज माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांच्या कारखान्याला ऊस घालण्याची लोकांची मानसिकता राहिलेली नाही.त्यामुळे त्या कारखान्याचे गाळप सुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे.त्यासाठी आता त्यांना नवीन बाजारपेठ शोधायची आहे. म्हणून त्यांनी आपला करमाळा तालुक्यातील त्यांचा चेला असणाऱ्या विद्यमान आमदाराला पुढे करून आदिनाथ ताब्यात घेण्याचे मनसुबे आखले आहेत.जेणेकरून आदिनाथ चालणारच नाही आणि चालू करण्याचा प्रयत्न झाला परंतु गाळप होऊ शकले नाही तर आदिनाथ तर्फे सहकारमहर्षी असा ऊस पाठवायचा.विद्यमान आमदाराकडे एक टिपरू गाळप करण्यासाठी साधे गुराळ सुद्धा नाही आणि मग कार्यकर्त्यांचे ऊस घालण्यासाठी ते सहकार महर्षीच्या वळचणीला आदिनाथ कारखाना बांधतील.मुळातच अडचणीत असलेला सहकार महर्षी कारखाना शेतकऱ्यांना उच्चांकी दर देऊ शकणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल.आदिनाथ ची निवडणूक दिसते तेवढी साधी ,सोपी, सरळ नाही त्यामागे फार मोठे राजकारण आणि अर्थकारण शिजत आहे. मोहिते पाटलांकडून माढा,पंढरपूर,माळशिरस या तीन तालुक्यांमध्ये गाढवाचा नांगर फिरवून झालेला आहे .आता त्यांची वाकडी नजर करमाळ्यावर पडलेली आहे.आणि ही सर्व सेना आपल्या करमाळ्यावर गाढवाचा नांगर फिरवण्यासाठी सज्ज झालेली आहे.त्यामुळे सभासदांनों सुज्ञ पणे विचार करून डोळस निर्णय घ्या व येत्या १७ तारखेला पंतग चिन्हावर मतदान करून महायुती आदिनाथ बचाव पॅनलला पूर्ण बहुमताने निवडून असे आवाहनही माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.