"नाद" सायकलीवर देवदर्शन करणारा अवलीया....राजू(भाऊ) देवकते


करमाळा :-करमाळा तालुक्यातील विहाळ येथील रहिवासी राजू(भाऊ) देवकते. दुष्काळग्रस्त भाग, उदरनिर्वाहाच्या साधनांची कमतरता म्हणून विहाळ या गावातील अनेक होतकरू तरूणासोबत रोजगाराच्या निमित्ताने पुणे शहरात आलेला.मिळेल ते काम करत उदरनिर्वाह ते करू लागले.बहुतेक लोक कात्रज परिसरात स्थायिक झाले. 
   त्यांच्या विहाळ गावत ग्रामदैवत काळभैरवनाथ हे जागृत देवस्थान आहे.हे भैरवनाथाचे मंदिर दक्षिणमुखी आहे.ते लहानपणापासूनच भैरवनाथाचा निस्सीम भक्त आहेत.कात्रज परिसरात आल्यावर त्यांना असे कळाले की कात्रजमध्ये भैरवनाथाचे मंदिर आहे.मनाला उदासी वाटल्यास किंवा काही मानसिक ताण आल्यावर ते अधूनमधून या कात्रजच्या भैरवनाथ मंदिरात जात.ते भैरवनाथाचा निस्सीम भक्त असल्याने याही भैरवनाथाच्या मंदिरात गेल्यावर आणि दर्शन घेतल्यानंतर त्यांना अवर्णनीय मनःशांती मिळत होती.आमच्या विहाळ गावचे भैरवनाथ मंदिर दक्षिणमुखी,कात्रज येथील मंदिरही दक्षिणमुखी,दोन्ही मूर्तीही हुबेहूब एकसमान! त्यामुळे गावातील भैरवनाथाचे दर्शन घेतल्याचा आनंद होत होता.विहाळ गावातील भैरवनाथाची पालखी वर्षातून दोन वेळा निघते.कात्रज येथील भैरवनाथाची पालखीही दोन वेळा निघते. 
     हे सर्व साम्य लक्षात घेता,मनात अशी कल्पना आली की,या दोन भैरवनाथांना जोडणारी एक तीर्थयात्रा करावी. पण ती कशी करावी? कोणत्याही वाहनाने करावी म्हटले तर त्यात वेगळेपण असे काहीच नव्हते. अनेक लोक चारचाकी वगैरे वाहनांनी अनेक तीर्थांच्या तीर्थयात्रा करतात. यात वेगळे काय आहे? आपण काहीतरी वेगळे करावे असे मनात ठरविले. 
   याच वेळी अचानक सुचले की आपण सायकलने ही तीर्थयात्रा करावी.चैत्र वद्य अष्टमीला विहाळ गावाची भैरवनाथाची यात्रा असते.त्या अगोदर आठ दिवस म्हणजे हनुमान जयंती दिवशी परंडा तालुक्यातील सोनारी या गावावरून विहाळपर्यंत ज्योत आणली जाते. आमच्या विहाळ गावच्या भैरवनाथाचे मूळ ठाण सोनारी हे आहे. म्हणून त्यांनी असे ठरविले की, कात्रजच्या भैरवनाथ मंदिरापासून सायकलने प्रवास सुरू करायचा, नंतर विहाळहून सोनारी येथे जायचे. आणि पुन्हा ज्योतीबरोबर सायकलवरच विहाळ येथे परत यायचे! 
    एकदाचे ठरले...!! आणि पहाटे 3.30 वा. सायकलवर प्रवास सुरू केला. हे सर्व अंतर दोनशे ते अडीचशे किलोमीटरहून जास्त आहे.एवढे अंतर, ते ही सध्याच्या उन्हाळ्यात प्रवास करणे सोपे नव्हते तर एक आव्हान होते.त्यासाठी सायकलिंगचा खूप सराव केला.दरम्यान दररोज कात्रज ते कात्रज घाटापर्यंत चढ असलेल्या मार्गावरून दहा किलोमीटर इतकी सायकलिंग केली.सायकलिंगचे सर्व नियम आत्मसात केले. 
    पहाटेच प्रवासाला प्रारंभ केला. त्यांच्यासाठी हा एक अद्भुत,अविस्मरणीय अनुभव होता. सायकलवरून लोणी, उरूळी, यवत, केडगाव, पाटस वगैरे गावे पटापट मागे पडत होती.माझे देहभान हरपल्यासारखे झाले होते.कसलाही थकवा नव्हता,आळस नव्हता, कंटाळा नव्हता... तर एक प्रकारचा उत्साह होता..!यावेळी अन्नच सोडा तर पाण्याचीची आठवण झाली नाही.कात्रज (पुणे) ते भिगवण असा सुमारे शंभर किलोमीटरचा प्रवास एकदाही न थांबता एका दमात केला. ही एक अविश्वसनीय बाब होती! 
   त्यानंतर भिगवण येथीलही काळभैरवनाथाचे दर्शन घेतले.थोडी विश्रांती घेतली. चहापान नाष्टा केला. अर्ध्या तासानंतर पुन्हा विहाळच्या दिशेने सायकल दामटली. 
   ते पुण्याहून सायकलवरून येत आहे याचे विहाळ येथील अनेक गावकऱ्यांना आणि लोकांना कौतुक वाटले.त्यानंतर त्यांनी मार्गात कुंभारगाव, सावडी या गावांमध्ये चहापान, नाष्टा, शरबत वगैरे सेवा पुरविल्या.यामुळे त्यांना पुन्हा प्रोत्साहन मिळाले. आणि सुमारे 155 किलोमीटरचा प्रवास नऊ तासात पूर्ण झाला.मुक्कामी विहाळ या त्यांच्या गावात आले.त्यांचा प्रवास एवढ्यातच संपला नव्हता.विहाळ गावातील तरुण भैरवनाथाची ज्योत आणण्यासाठी रात्री दहा वाजता निघाले. ते सर्वजण टेंम्पो, मोटारसायकली वगैरे वाहनांनी जातात.पण त्यांना त्यांची यात्रा सायकलवरूनच पूर्ण करायची होती. अर्थात सायकलवरून भैरवनाथाची तीर्थयात्रा करणे हा त्यांचा नवस वगैरे नव्हता.पण हा एक वेगळा अनुभव घ्यायचा त्यांचा ध्यास होता.त्यांची भैरवनाथावर निस्सीम निष्ठा आणि भक्ती होती. त्या निष्ठेने ते हे आनंदाने करत होतो. 
    टेंपो किंवा मोटारसायकलींच्या बरोबर सायकलवरून जाणे कसे शक्य होईल. त्यामुळे ते सायंकाळी पाच वाजताच विहाळहून सोनारीकडे निघलो. पुढे आणखी पंचावन्न किलोमीटरचा प्रवास!पण त्याची त्यांना काळजी वाटत नव्हती.अगोदरच निघून साडेनऊच्या सुमारास सोनारीला पोहोचले. 
    रात्री बाराच्या सुमारास ज्योत नेणारी तरूण मंडळी सोनारीला पोहोचली. तेथे स्नान वगैरे करून, भैरवनाथाचे दर्शन घेऊन,ज्योत घेऊन आम्ही पुन्हा माघारी निघालो.देवकाते ही सायकलवरून गावाकऱ्या बरोबर पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले. सायकलवरून प्रवास करून विहाळ येथे आले.असा एकंदर अडिचशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला! 
   त्यांच्या या प्रवासात प्रेरणा देणारे त्यांचे मित्र नाना मारकड, सुनील मारकड यांनी मानसिक बळ दिले तसेच मदतही केली. त्यानंतर पानाचंद देवकते यांनी मोटार सायकलवरून साथ केली.पानाचंद देवकते यांनी प्रोत्साहन देताना सांगितले की, अलीकडच्या काळात सायकलिंगचे महत्त्व खूप वाढले आहे, अलीकडे लोक चालत नाही, व्यायाम नाही, कुठेही जायचे म्हटले तरी मोटार सायकलचा वापर करतात. त्याने प्रदूषण होते. आरोग्य राहत नाही. त्यामुळे भावी पिढीसाठी सायकलिंग ही एक फार मोठी प्रेरणा आहे. सायकलिंगचे अनेक फायदे आहेत. तुझा उपक्रम लोकांना मार्ग दाखविणारा आहे. पानाचंदच्या कौतुकाने त्यांना आणखी प्रेरणा मिळाली. 
   त्यांची ही कल्पना त्यांनी घरी, पत्नीपासूनही लपवून ठेवली होती. कारण घरच्यांना माहीत झाले असते तर त्यांनी काळजीपोटी या प्रवासाला विरोध केला असता. आणि त्यांचे सायकलिंग पूर्ण झाले नसते. 
   श्री भैरवनाथ, श्री बाळूमामा, ग्रामस्थ आणि मित्रमंडळ यांच्या आशीर्वादाने त्यांची ही यात्रा पूर्ण झाली याचा त्यांना मनस्वी आंनद आहे. याबाबत त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभारही मानले आहेत 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....