पत्रकारांच्या लेखणीला मिळाली नवी धार....!अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाची वृत्तलेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न; जिल्हाभरातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा प्रतिनिधी : “वृत्तलेखन ही एक कला असून ती केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर आजच्या काळात ते संवादाचे अत्यंत प्रभावी माध्यम बनले आहे,” असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अंबादास भासके यांनी केले.तर, “वृत्तलेखनामध्ये स्पष्टपणा, परखडपणा आणि लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्यास ते लेखन जनमानसात पोहोचते,” असे मत अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या मीडिया अँड मास कम्युनिकेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. बापू चंदनशिवे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित मोफत ‘वृत्तलेखन कार्यशाळेत’ दोन्ही मान्यवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
🔹पत्रकारांच्या कौशल्यविकासासाठी अभिनव उपक्रम
जिल्ह्यातील पत्रकारांच्या लेखणीला अधिक धार मिळावी तसेच वृत्तलेखनातील कौशल्य आणि गुणवत्ता विकसित व्हावी, या उद्देशाने संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री विठ्ठल आणि आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी आरोग्य शिबिरे, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत कार्यशाळेमागील उद्देश स्पष्ट केला.
🔹वृत्तलेखनाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन
कार्यशाळेला सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ. अंबादास भासके आणि डॉ. बापू चंदनशिवे यांनी वृत्ताची मांडणी, प्रभावी मथळा, वृत्तलेखनातील स्पष्टता, परखडपणा, लोकहिताचे प्रश्न, डिजिटल माध्यमातील लेखनशैली यांसह वृत्तलेखनाच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले.व्याख्यानानंतर झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात उपस्थित पत्रकारांनी विविध प्रश्न उपस्थित केले. मार्गदर्शकांनी त्यांचे निरसन करून पत्रकारांना प्रत्यक्ष वृत्तलेखनासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले.
🔹मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, राज्य तांत्रिक सल्लागार नागनाथ सुतार, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी जाधव, शहराध्यक्ष सोहन जयस्वाल, तालुकाध्यक्ष नामदेव लकडे, करमाळा तालुकाध्यक्ष दिनेश मडके, उपाध्यक्ष संजय साखरे, सहसचिव तुषार जाधव, तालुका प्रवक्ता नितीन झिंजाडे, राहुल रामदासी, तसेच मराठी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कोरके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष अपराजित सर्वगोड, नगरसेवक दीपक चंदनशिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
🔹मार्गदर्शकांचा सन्मान; पत्रकारांना प्रमाणपत्र वाटप
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी दोन्ही प्रमुख मार्गदर्शकांचा संघाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच कार्यशाळेत सहभागी झालेल्या पत्रकारांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रशांत माळवदे यांनी केले.पत्रकारांच्या लेखणीला ज्ञान, कौशल्य आणि गुणवत्तेचे बळ देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित पत्रकार तसेच विविध स्तरातून कौतुक करण्यात आले.