श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात ; वधुवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे गणेश चिवटे यांचे आवाहन
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- श्रीराम प्रतिष्ठान,करमाळा आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी 25 हून अधिक जोडपी विवाह बंधनात अडकणार आहेत.या शुभविवाह प्रसंगी नव विवाहित जोडप्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनीही नव वधूवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले आहे.याबाबत अधिक बोलताना गणेश चिवटे म्हणाले की,
गेल्या तीन वर्षांपासून आपण सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करत आहोत. सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने हे काम आम्ही अविरतपणे करत आहोत. यावर्षी हा विवाह सोहळा रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.२१ मिं या गोरज मुहूर्तावर आयोजन केले आहे. चांदगुडे प्लॉटींग , श्री देवीचामाळ येथे विवाह सोहळा शाही थाटात संपन्न होणार असून तब्बल २० हजार वऱ्हाडींची जेवणाची व बैठक व्यवस्था खुर्चीवर करण्यात आली आहे. विवाह सोहळा व जेवण व्यवस्था यासाठी दोन स्वतंत्र भव्य मंडप उभारले असून सकाळी ११ वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी जेवण उपलब्ध असणार आहे. परण्यासाठी सर्व नवरदेवांना घोडे उपलब्ध केले असून करमाळा शहरातून परण्या काढण्यात येणार आहे. नवऱ्या मुलींसाठी मेकप किट,वधू वारांना कपडे चपला बूट, संसारुपयोगी साहित्य पुरवण्यात येणार आहे. एकंदरीत हा विवाह सोहळा अत्यंत देखणा व शाही पद्धतीने पार पडणार आहे.
तालुक्यातील सर्व नागरिकांनी या विवाह सोहळ्यासाठी व वधू वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन चिवटे यांनी केले आहे