खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर याच्या प्रयत्नाला मोठं यश:कृष्णा-भीमा उपखोऱ्यातील दुष्काळी कामाचे सर्वेक्षणास राज्य सरकारची मान्यता.....करमाळ्यासह भीमा उपखोऱ्यातील २६ तालुक्याना होणार फायदा
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा : कृष्णा-भीमा खोऱ्यातील पाण्याचा योग्य समतोल साधण्यासाठी कृष्णा नदीच्या पुराचे ५० टीएमसी पाणी 'कृष्णा फ्लड डायव्हर्जन' या योजनेअंतर्गत बोगद्याद्वारे वळवून भीमा उपखोऱ्यातील दुष्काळी भागास देण्याच्या कामाचे सर्वेक्षण करण्यास आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाला हे मोठं यश मिळालं आहे.कृष्णा नदीतील अतिरिक्त पुराचे पाणी 'कृष्णा फ्लड डायव्हर्जन' या योजनेद्वारे वळवता येणार आहे.परिणामी कृष्णा खोऱ्यात पुरामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळता येणार आहे.मुख्यतः भीमा उपखोऱ्यातील अतिरिक्त पाणी दुष्काळी सोलापुरातील माळशिरस, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, साताऱ्यातील खंडाळा, फलटण, माण, सांगलीतील जत, आटपाटी, खानापूर, कवठेमहांकाळ, आष्टा, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, परंडा, भूम, कळंब व पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर सह या भागांतील २६ तालुक्यांना देण्यासाठी या सर्वेक्षणाद्वारे कृष्णा फ्लड डायव्हर्जन योजनेच्या कामाच्या सर्वेक्षणाचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेकरिता शासनास सादर करण्यात आला आहे.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आशियाई विकास बँकेच्या प्रतिनिधींनी नुकतीच पाहणीही केली होती व या प्रकल्पास अर्थसाह्य करण्याविषयी सकारात्मकता दर्शवली आहे.
यापूर्वी गतवर्षी ७ नोव्हेंबर २०२२ ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कायमस्वरुपी पूर नियंत्रण आणि हे पाणी वळवण्याच्या योजनेबाबत सादरीकरण झाले होते.त्यानंतर आशियायी बँकेकडून अर्थसाह्य मिळवण्याबाबतही अंतिम चर्चा पूर्ण झाली होती. याबाबत प्राथमिक अहवाल करण्याचे ठरवून अलीकडेच यासंबंधीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता.त्यानुसार आता स्वतः उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या कामाच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.यामुळे भीमा उपखोऱ्यातील जनतेच्या विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे व यापुढील निवडणूक पाण्याच्या प्रश्नावर लढवली जाणार नाही हा खा.निंबाळकरांनी जनतेला दिलेला शब्द खरा ठरला आहे.